सोशल मिडीयाचा अचूक, योग्य व प्रभावी वापर ठरला निवडणुकीत महत्वाचा भाग
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026

शिरूर (जिल्हा-पुणे) : सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे वातावरण आहे. नुकताच त्यांचा निकालही लागला. अत्यंत कमी कालावधी असताना तसेच अनेक उमेदवार हे नवे चेहरे असताना आपला जाहीरनामा जनतेसमोर नेऊन त्यांचा विश्वास संपादन करणे हे कठीण काम होते, मात्र सोशल मिडीयाचा अचूक, योग्य आणि प्रभावी वापर करून कमी दिवसांमध्ये संयमी आणि शांत प्रचार करत जनतेला ते काम पटवून दिल्यामुळे उमेदवारांचा विजय झाल्याची चर्चा सध्या जनमाणसांमध्ये दिसत आहे.

या निवडणुकीत शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचे वृषाली वाळके, दिपक पवार आणि स्वाती घावटे हे उमेदवार नवीन होते, पण त्यांच्या विकासाबाबत भूमिका जनतेला पटवून देण्यात शिरूर परिसरातील मीडियाने मोठा वाटा उचलला त्यामुळे सर्वत्र या भागातील सोशल मिडीयाचेही कौतुक केले जात आहे.

मांडवगण-वडगाव रासाई गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार यांनी यापूर्वी केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच जनतेच्या मनातील भावना काय आहेत? त्यांना उमेदवा्रांकडून काय अपेक्षित आहे? हे उमेदवारांना समजण्यासाठीही सोशल मिडीयाचा वापर योग्य पद्धतीने केला गेला.

रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात झालेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दाखवली गेली. जनतेच्या समस्या मग त्या पाणीप्रश्न असो किंवा बिबट्याचा वावर तसेच शेतीसंदर्भात, रस्त्यांसादर्भात जनतेची मते सोशल मीडियावर दाखवली गेल्याने यावर उमेदवारांना आपल्या प्रचाराची दिशा ठरवण्यास मदत झाली.
जे प्रतिष्ठित उमेदवार यात मागे राहिले त्यांना जनतेपर्यंत पोहोचता आले नाही आणि परिणामी निवडणुकीत मोठी निराशा पदरी पडली अशी प्रतिक्रिया आता जनतेमध्ये उमटत आहेत.



