आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाला आता शिरूर तरुणांनी पाठिंबा देत उपोषण केले सुरू
सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी व अनिल डांगे यांचा सहभाग

♦शिरूर दि. ३० ( अरुणकुमार मोटे ):
सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत सुरू केलेल्या उपोषणाला आता शिरूर (जि.पुणे) मधूनही तरुणांनी पाठिंबा देत तहसील कार्यालय शिरूर येथे उपोषण सुरू केले आहे. सकल मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवार (दि. २५ जाने.) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.जरांगे यांच्या उपोषणाला शिरूर येथील सावळाराम आवारी व अनिल डांगे यांनी शिरुर तहसील कार्यालय आवारात मंगळवार (दि. २८ जाने.) पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी उपोषणकर्ते सावळाराम आवारी व अनिल डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, मराठा समाजाचा एक घटक म्हणून आम्हीही या समाजाचे काही तरी देणे लागतो. अनेक वर्षांपासून सरकारने मराठा समाजाला आरक्षणासाठी खेळवत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सुरूच ठेवणार आहोत. दरम्यान या आमरण उपोषणाला शिरूर तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे .



