शिरूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विनोद पाटील यांची नियुक्ती; कायदा-सुव्यवस्थेला नवे नेतृत्व

शिरूर, दि. ८ : शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप केंजळे यांची पुणे येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्यांनी शिरूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नियुक्तीमुळे शिरूर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला नवे नेतृत्व लाभले आहे.

नवनियुक्त पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना पोलीस दलातील तब्बल २८ वर्षांचा अनुभव आहे. मुंबईसह विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या पदांवर कार्य केले असून, गुन्हे तपास, प्रशासकीय कामकाज आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यातील त्यांच्या कार्यक्षमतेची ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा शिरूरसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या तालुक्याला होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिरूर शहर व तालुक्यातील नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विनोद पाटील यांचे स्वागत केले आहे. वाढती लोकसंख्या, वाढते गुन्हेगारीचे आव्हान आणि महामार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता शिरूर पोलीस ठाण्याची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नवीन नेतृत्वाकडून गुन्हेगारीवर अधिक प्रभावी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा आणि नागरिकाभिमुख पोलीस प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या नव्या नेतृत्वाखाली कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल आणि सर्वसामान्य नागरिकांना जलद व प्रभावी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नुकतेच शिरूर तालुक्यातील पत्रकारांनी नवीन पोलीस निरीक्षकांशी यावर चर्चा करून त्यांचे स्वागतही केले.



