शैलेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश; नगरपरिषदेकडून गतिरोधक सुरक्षित
नगरसेवक सागर नरवडे यांनी बजावली महत्वाची भूमिका

शिरुर (प्रतिनिधी) – शिरुर शहरातील हुडको कॉलनी परिसरातील धोकादायक ठरत असलेल्या गतिरोधकांबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर अखेर शिरुर नगरपरिषदेने आज दिनांक १७ मे २०२६ रोजी संबंधित गतिरोधकांवर पांढरे परावर्तित पट्टे मारण्याचे काम करण्यात आले आहे.

हुडको कॉलनीतील सनराईज कटिंग दुकानाजवळ, सुखकर्ता किराणा दुकानाजवळ आणि आदित्य सुपर मार्केटजवळ बसविण्यात आलेल्या तीन गतिरोधकांवर कोणतेही परावर्तित रंगकाम अथवा सूचना फलक नसल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना गतिरोधक न दिसल्याने अचानक ब्रेक लावावे लागत होते.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी स्थानिक नागरिकांच्या वतीने शिरुर नगरपरिषदेकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली होती. तसेच दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी आदित्य सुपर मार्केटजवळील गतिरोधकामुळे झालेल्या किरकोळ अपघाताचाही उल्लेख निवेदनात करण्यात आला होता.
निवेदनात गतिरोधकांवर परावर्तित रंगकाम करणे, सूचना फलक लावणे, मापदंड तपासणे तसेच संबंधित अधिकारी व ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली होती.
नगरसेवक सागर नरवडे यांनी या मागणीची दखल घेत पाठपुरावा करून हे काम करण्यात महत्वाची भूमिका बजावली. आज नगरपरिषदेकडून संबंधित गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आले. याबाबत बोलताना सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी सांगितले की, “उशिरा का होईना पण प्रशासनाला जाग आली आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक काम पूर्ण करण्यात आले, याबद्दल प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले. नागरिकांनीही या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत पुढील काळात सर्व गतिरोधकांवर नियमांनुसार सूचना फलक व सुरक्षितता उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.



