शिरूर तालुक्यातील कायदा सुव्यवस्था रामभरोसे?
पोलिसांच्या भूमिका संशयास्पद.निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांचे फावतेय.

शिरूर | प्रतिनिधी : शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गोळीबार, टोळीयुद्ध, भररस्त्यात चैन स्नॅचिंग, दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांच्या हालचाली अशा गंभीर घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस यंत्रणा निष्क्रिय झालेल्या आहेत का? यावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. वारंवार घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत.
काही नागरिकांनी आपला संताप व्यक्त करताना विद्यमान आमदार आणि खासदारांवर सडकून टीका केली आहे. शिरूर तालुक्याकडे होत असलेलं दुर्लक्ष आणि लोकप्रतिनिधींनी झटकलेली जबाबदारी यावर आता नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत. पोलिसांचा धाक न राहिल्याने आता उघडपणे गुन्हेगार पत्रकारांनाही शिवीगाळ करत आहेत आणि तक्रार नोंदवूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.
अलीकडील काही घटनांमध्ये भररस्त्यात चैन हिसकावण्याचे प्रकार, टोळक्यांमधील वादातून झालेला गोळीबार आणि सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करणाऱ्या घटना समोर आल्या आहेत. या घटना केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांवर तातडीने आणि कठोर कारवाई झाली नाही तर अशा घटनांना आणखी खतपाणी मिळू शकते. नियमित गस्त, संशयितांवर लक्ष, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शिरूर तालुक्यात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणार की गुन्हेगारांचेच मनोबल वाढत राहणार, हा प्रश्न सध्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे.



