वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
शिरूरपासून मोहिमेचा शुभारंभ!
शिरूर | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यासह पुणे ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांविरोधात व्यापक आणि धडक कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शिरूर उपविभागातून करण्यात आला असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) रविंद्र भोसले यांनी या मोहिमेबाबत बोलताना, “Reactive Policing नव्हे, तर Proactive Policing हीच काळाची गरज आहे. गुन्हा घडण्याची वाट न पाहता संभाव्य गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविणे, नागरिकांचा सहभाग वाढविणे आणि तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, यावर आमचा भर असेल,” असे स्पष्ट केले.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनीही गुन्हेगारांना कडक इशारा देत सांगितले की, “शिरूरमधून सुरू झालेल्या या मोहिमेत कायदा हातात घेणाऱ्या, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या प्रवृत्तींना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गरज पडल्यास अशा गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत राहून सार्वजनिक ‘महाप्रसाद’ दिला जाईल. गुन्हेगारीला मुळापासून आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे.”
या मोहिमेत शिरूर उपविभागातील सर्व पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, नागरिक, पत्रकार, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग वाढवून प्रतिबंधात्मक कारवाई अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. सराईत गुन्हेगारांवर विशेष नजर, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि संवेदनशील भागात सातत्याने गस्त घालण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचा स्पष्ट संदेश आहे – “गुन्हेगारांवर कठोर कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण.” शिरूरपासून सुरू झालेली ही मोहीम संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.



