शिरूरमध्ये प्रचंड जयघोषात पार पडतोय श्री रामलिंग महाराजांचा पालखी सोहळा
श्री रामलिंग पालखी स्वयंसेवक मित्र मंडळाचे मोलाचे योगदान
शिरूर (जि. पुणे ) : शिरूर तालुक्यातील जागरूक देवस्थान श्री रामलिंग महाराज यात्रा दरवर्षी महाशिवरात्रीला रामलिंग (जुने शिरूर) येथे भरते, त्याअगोदर एक दिवस या यात्रेच्या पालखीचा मान शिरूर शहराला असतो तर यात्रेचा मान शिरूर पंचक्रोशीतील गावांना असतो. यंदा पालखीचे हे ५१ वे वर्ष आहे.

शिरूर शहरातील शिवसेवा मंदिरात श्री रामलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते महाआरती होऊन पालखी सोहळ्यास दुपारी सुरुवात झाली. यावेळी शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे ही उपस्थित होते.

संपूर्ण शहराच्या मुख्य बाजारपेठेतून निघालेल्या सवाद्य मिरवणूक पालखीचे जुन्या शिरूरकडे (रामलिंग) मार्गक्रमण होत आहे.

संपूर्ण शहरात ‘हर हर महादेव, रामलिंग महाराज की जय’ – अशा प्रचंड जयघोषात ढोल-ताशा आणि सुमधुर बँड, टाळ घोषांच्या गजरात रामलिंग महाराजांच्या पालखीचे मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान होत आहे.

या सोहळ्या दरम्यान श्री रामलिंग पालखी स्वयंसेवक मित्र मंडळाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. पालखी सजवण्यापासून तर संपूर्ण गावात मिरवण्यापर्यंत अतिशय महत्त्वाचे योगदान हे मंडळ करत असते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी मार्ग स्वच्छ आणि सुशोभित करण्यासाठी नगरसेवक संदीप गायकवाड यांनी यावर्षीही विशेष स्वच्छता उपक्रम राबवला. तसेच हा उपक्रम अधिक प्रभावी व्हावा म्हणून पाण्याच्या ट्रॅक्टरचे सौजन्य सौरभ पाचर्णे यांनी दिले. स्वतः या उपक्रमात भाग घेऊन रस्ते स्वच्छ करण्यात योगदान दिल्यामुळे नगरसेवक संदीप गायकवाड यांचे शिरूर व परिसरातून कौतुक केले जात आहे.



