महाराष्ट्रसामाजिक

शिरूर तालुक्यात गुन्हेगारांना कोण पाठीशी घालतयं? आणि गुन्हेगारी वाढण्यास कोण जबाबदार? सामान्य नागरिकांचा सवाल!

शिरूर : शिरूर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. चैन चोरी, गोळीबार, शिवीगाळ, मारहाण अशा प्रकारच्या घटना सर्रास घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे “शिरूरमध्ये पोलिसांचा धाक राहिलाच नाही का?” असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारेल, गुन्हेगारीला आळा बसेल आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अपेक्षित घट दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

गेल्या काही दिवसात नागरिकांना आणि पत्रकारांना शिवीगाळ करण्याचे प्रमाणही वाढले आहे मात्र पोलिसांशी जवळीक असल्यामुळे या गुन्हेगारांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. आरोपीच्या सोशल मीडियाच्या अकाउंट वर पोलिसांचे झळकणारे फोटो आणि “रेकॉर्डेड शिवीगाळीचे पुरावे असूनही करवाईसाठी होणारी विलंबता” यात काय गौडबंगाल आहे हे लोकांना समजत नाहीये.

अलीकडील काळात घडलेल्या विविध घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः चैन हिसकावणे आणि गोळीबारासारख्या गंभीर स्वरूपाच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, गुन्हेगारांवर कठोर कारवाई, नियमित गस्त, संशयितांवर प्रभावी नजर आणि कायद्याची कडक अंमलबजावणी यावर भर देण्याची गरज आहे. अन्यथा गुन्हेगारीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्यामुळे घरातून बाहेर पडनेही मुश्किल झाल्याचे काही जेष्ठ मंडळींनी सांगितले तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही गंभीर रूप धारण करत आहे. पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेची चर्चा सध्या प्रत्येक कट्ट्यावर, पारावर चर्चेचा मुद्दा बनत आहे. मात्र याबाबत पोलीस प्रशासनाला काही फरक पडतो का याचे उत्तर पोलिस प्रशासनचं देऊ शकेल.

Related Articles

Back to top button