मंचर मधील पत्रकारांवर हल्लाप्रकरणी शिरूरमधील पत्रकार संघटनेचे तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन!
लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभालाच धोखा!

शिरुर (जि. पुणे ) : मंचर मध्ये समर्थ भारत च्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी आता पत्रकार संघटनाही आक्रमक झाल्या आहेत.

पत्रकारांना झालेली अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणी तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोषींवर कडक कारवाई व्हावी म्हणून शिरुर मधील महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या पत्रकारांनी पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. तसेच झालेल्या प्रकरणाचा कडक शब्दात निषेधही व्यक्त केला आहे.

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. मात्र समाजातील काही विकृत लोकांनी हा चौथा आधारस्तंभच मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालू केला आहे.
मंचर येथील नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या एका बांधकाम व्यावसायिकाने त्याच्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारी केल्याचा संशय, वीज मीटर मध्ये हेराफेरी करून वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय तसेच या इमारतीतील सदनिकेची विक्री करून या ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिकाधारकांची फसवणूक असे प्रकार उघडकीस येण्याचे रागातून हे कृत्य केल्याचे मानले जात आहे.
या घटनेचा विडिओ CCTV मधून प्राप्त झाल्यानंतर घटनेचे सत्य समोर आले आहे. या घटनेचा जाहीर निषेध पत्रकार संघटना करत आहेत.

यावेळी मागणीचे निवेदन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना देण्यात आले. यावेळी शिरूर तालुका ग्राहक पंचायत अध्यक्ष अरुणकुमार मोटे,शिरुर तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल बोंबे, उपाध्यक्ष सुनिल जिते, माजी अध्यक्ष तेजस फडके, कार्याध्यक्ष सागर रोकडे,शिरूर शहराध्यक्ष निलेश काळे, साहेबराव लोखंडे, धनंजय साळवे आदी पत्रकार उपस्थित होते.



