
शिरुर (जि. पुणे) (प्रतिनिधी:अमोल पवार) : दरवर्षी प्रमाणे रंगपंचमी निमित्ताने न्हावरे फाटा येथील कानिफनाथ मंदिर येथे यात्रामहोत्सव साजरा झाला. रंगपंचमीच्या दिवशी सकाळी ७:०० वा महापूजेने कार्यक्रमाची सुरुवात झाली, सकाळी ८:०० वा. नाथांवर महाभिषेक होऊन होमहवन झाला.
सकाळच्या महाआरती नंतर मानाच्या काठ्या कळसाच्या भेटीला आल्या होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने सासवड, लोणी काळभोर,अलिबाग, उरळगाव, पारगाव येथील काठ्या बरोबर शिरूर पंचक्रोशीतील मानाच्या काठ्याही नाथांच्या कळसाच्या भेटीला आल्या होत्या. कानिफनाथ मंदिराकडून दिवसभर अतिशय सुंदर महाप्रसादाचे आयोजन केले होते. पंचक्रोशीतील आणि बाहेरील भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.

संध्याकाळी शिरूर येथील नामांकित अलंकार बँडने सुरेल असे सुमधुर भक्तीपर गाणे वाजवून परिसर गजबजून सोडला होता. त्याच बरोबर फटाक्यांची आतिषबाजी झाली. नयनरम्य अशा विद्युत रोषणाईने कानिफनाथ महाराज मंदिराचे सौंदर्य खुलून गेले होते.

रात्री ९:०० नंतर तरडोबाचीवाडी येथील भजनी मंडळाचे भजनाचा कार्यक्रम होता, या यात्रेसाठी कानिफनाथ महाराज यात्रा उत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थांनी या यात्रेसाठी अथक परिश्रम घेतले.




