पाईपलाईन कामानंतर रखडलेली रस्ता दुरुस्ती अखेर सुरू; हुडको वासियांच्या तक्रारीनंतर नगरपालिकेची तत्काळ कारवाई
नगरसेवक रिंकूताई जगताप आणि जनसेवक अविनाश घोगरे यांच्यामुळे सुटत आहेत समस्या

शिरूर (प्रतिनिधी): हुडको कॉलनी परिसरात पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. खोदकाम पूर्ण होऊनही संबंधित ठेकेदारामार्फत रस्त्याची तातडीने दुरुस्ती न केल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच दैनंदिन जीवनावरही परिणाम होत होता.
या पार्श्वभूमीवर हुडको वासियांनी आपल्या तक्रारी सोशल मिडिया ग्रुपवर मांडल्या. तक्रारींची दखल घेत नगरसेविका रिंकूताई जगताप तसेच जनसेवक अविनाश घोगरे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. काल नगरपालिकेचे संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना प्रत्यक्ष घटनास्थळी बोलावून कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
नगरपालिकेच्या निर्देशानुसार आज संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय दूर व्हावी यासाठी नगरसेविका रिंकूताई जगताप आणि अविनाश घोगरे हे स्वतः कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून काम सुरू करून घेत असल्याने प्रशासनाच्या तत्परतेचे सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
हुडको वासियांची प्रतिक्रिया :
“पाईपलाईनसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र तक्रार केल्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून काम सुरू केले. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.



