महाराष्ट्र

शिरुरमध्ये मनसे ‘मराठी’ वरून आक्रमक!

मराठी पाट्या आणि विविध व्यवस्थापनातील दैनंदिन कामकाज मराठीतून व्हावे म्हणून मनसे कार्यकर्त्यांची मागणी

शिरुर (जिल्हा -पुणे) (प्रतिनिधी: शैलेश जाधव ) दैनंदिन जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. आपली मातृभाषा ही आपली ओळख असते. परंतु सध्याच्या संगणक युगात मातृभाषा मागे पडून इंग्रजीने आणि हिंदीने आपला प्रभाव पाडण्यास सुरुवात केली आणि ग्रामीण भागातील सामान्य जनतेला याचा त्रास होऊ लागला. बऱ्याच व्यवस्थापनामध्ये मराठीतून कामकाज होत नसल्याने आता शिरुर शहरातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक लोक कामकाजानिमित्त बँक आणि तत्सम विभागामध्ये भेटी देत असतात, मात्र येथील इंग्रजी व हिंदी सारख्या भाषेमुळे लोकांची अडचण निर्माण होते.

शासन निर्णयानुसार दैनंदिन प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्याबाबतचे निवेदन शहरातील विविध बॅंकांना यावेळी देण्यात आले.

मनसेच्या पाडवा मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅंकांतील कामकाज मराठीतूनच असले पाहिजे, याबाबत स्थानिक पातळीवर आग्रह धरण्याच्या सूचना मनसे सैनिकांना दिल्या होत्या. त्यानुसार मनसे चे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, तालुका संघटक अविनाश घोगरे, शहर अध्यक्ष ॲड. आदित्य मैड, शहर उपाध्यक्ष रवीराज लेंडे, महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा डॉ. वैशाली साखरे, तालुका संघटक शारदा भुजबळ, मनविसेचे शहर संघटक गौरव शिंदे, अण्णासाहेब दौंडकर, अस्लम शेख, संतोष कोठावळे आदींनी आज बॅंकांसमोर घोषणाबाजी करीत निवेदन दिले. भारतीय स्टेट बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॉसमॉस बॅंक, कॅनरा, आयडीबीआय, ॲक्सिस, आयडीएफसी, पंजाब नॅशनल व युनियन बॅंकेच्या येथील शाखांमध्ये जाऊन शाखा व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

मराठी ही राजभाषा म्हणून स्वीकृत करण्यात आली असल्याने दैनंदिन प्रशासकीय व्यवहारात मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य असून, बॅंकेतील स्लीप, चलन हे देखील मराठीतून असले पाहिजे. शिवाय बहुतांश बॅंकांचा ग्राहक हा ग्रामीण भागातील मराठी माणूस असल्याने बॅंक अधिकाऱ्यांनी त्याच्याशी मराठीतूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली. येत्या आठ दिवसात याविषयाची दखल घेतली न गेल्यास आणि कामकाजात सुधारणा न झाल्यास आपण मराठी भाषेचा अपमान करीत आहात, असे समजून आपल्या बॅंक शाखेसमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

पाडवा मेळाव्यात पक्षाध्यक्षांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील सर्व बॅंकांमध्ये निवेदन दिले असून, बॅंकांतून शंभर टक्के मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, असा आग्रह धरला असल्याचे ॲड. मैड यांनी सांगितले.

 अनेक बॅंकांचे अधिकारी हिंदी भाषक आहेत. त्यामुळे ग्रामीण माणसाला त्यांचे बोलणे कळत नाही किंवा त्यांच्याशी हिंदीतून बोलताना बऱ्याचदा कुचंबणा होते. अनेक बॅंकांचे ग्राहक हे ग्रामीण भागातील, शेतकरी, कष्टकरी, कामगार असून, त्यातील बहुतांश हे मराठी भाषकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि त्यातही ग्रामीण भागातील बॅंक शाखांमध्ये शासन निर्णयाप्रमाणे मराठीतूनच कामकाज चालावे व अधिकाऱ्यांनी मराठी भाषा शिकावी.  

महिबूब सय्यद (उपाध्यक्ष पुणे जिल्हा मनसे )

——————————————————————

 मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला असताना आणि मराठी भाषेचा सर्वत्र गौरव होत असताना अनेक बॅंकांचे अधिकारी मग्रुरी करीत मराठी येत नाही, असे धडधडीतपणे सांगतात. भाषेने काय फरक पडतो, असे म्हणत आमचे म्हणणे टोलविणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवू. येत्या आठ दिवसात बॅंकांचे कामकाज शंभर टक्के मराठीतून न झाल्यास मनसे स्टाईलने खळ्ळ खटॅक केले जाईल.

अविनाश घोगरे (संघटक – शिरुर तालुका मनसे )

—————————————————————–

Related Articles

Back to top button