शिरूर नगरपरिषद निवडणुक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आघाडी
विद्यमान आमदार माऊली कटकेंचा वाढला जनसंपर्क

शिरूर (जिल्हा-पुणे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने जोरदार कमबॅक करत आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. विद्यमान आमदार माऊली कटके यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या अजितदादा गटाच्या पॅनलने एकजुटीने प्रचाराची मेहनत वाढवली आहे. सर्व जातीधर्मीयांना सोबत घेत गटाने निवडणुकीला सामोरे जाताना ठोस जनसंपर्क साधला आहे.

शिरूर कट्टा चॅनेलच्या निरीक्षणानुसार, काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्टपणे जाणवते. विशेषतः प्रभाग क्र. 3 मध्ये उमेदवार सुनिल जाधव यांच्या नावाभोवती जोरदार उत्साहाचे वातावरण आहे. रिक्षाचालक ते नगरसेवक उमेदवार असा संघर्षमय प्रवास करीत वर आलेले जाधव हे आमदार कटके यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या संघर्षमय प्रवासामुळे जनतेमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला आहे.

अनेक प्रभागांतही अशीच परिस्थिती दिसून येत असून, अजितदादा गटाच्या बाजूने सकारात्मक लाट जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आमदार माऊली कटके यांची वाढती लोकप्रियता, जनहिताचे उपक्रम आणि शिरूर शहरासाठी त्यांनी आणलेला 40 कोटींचा निधी या जमेच्या बाजू सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाला बळकट करीत आहेत.

निवडणुकीचे समीकरण वेगाने बदलत असताना, अजितदादा पवार गटाने घेतलेली ही आघाडी आगामी निवडणुकीत निर्णायक ठरणार का, याकडे शिरूर शहराचे लक्ष लागले आहे.



