Uncategorized

बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” वर नियुक्ती

शिरूरकरांसाठी अभिमानास्पद !

 

शिरुर तालुका प्रतिनीधी – (शैलेश जाधव)

शिरूर शहरातील सामाजिक, धार्मिक आणि गोरक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे बजरंग दलाचे प्रमुख कार्यकर्ते अजिंक्य तारु यांची महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती” अंतर्गत मानद प्राणी कल्याण अधिकारी या अत्यंत सन्माननीय पदावर नियुक्ती झाली आहे.

या निवडीमुळे शिरूर शहर, तालुका तसेच संपूर्ण पुणे जिल्ह्यातून विविध सामाजिक संघटना, नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि गोरक्षण प्रेमींनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत आणि अभिनंदन केले आहे. ही नियुक्ती म्हणजे त्यांच्या दीर्घकाळाच्या प्रामाणिक कार्याची शासनाकडून मिळालेली अधिकृत पोचपावती मानली जात आहे.

गोरक्षणाच्या चळवळीत अग्रस्थानी

अजिंक्य तारु हे गेली अनेक वर्षे शिरूर शहर व परिसरात गोहत्येच्या विरोधात, गोवंश रक्षणासाठी आणि प्राण्यांच्या हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांनी अनेकवेळा स्थानिक पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून गोरक्षणाच्या बाबतीत कार्यवाही घडवून आणली आहे. गायींचे अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करणे, अपघातग्रस्त जनावरांना वाचवणे, त्यांची वैद्यकीय मदत मिळवून देणे, अशा असंख्य घटना त्यांच्या कार्यकाळात घडल्या आहेत.

त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आज अनेक युवक गोरक्षण आणि प्राणीमित्र म्हणून पुढे येत आहेत.

निवडीनंतर यांची प्रतिक्रिया

या नियुक्तीनंतर बोलताना अजिंक्य तारु म्हणाले:

माझ्या कामाची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली, याचा मला मनस्वी अभिमान वाटतो. मी आजवर ज्या निष्ठेने गोरक्षणासाठी झटत होतो, त्या कार्याला आता एक अधिकृत ओळख मिळाली आहे. पुढेही संपूर्ण ताकदीने मी प्राणी कल्याणासाठी, गोवंश संरक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी कार्यरत राहीन. ही संधी मला अधिक जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा देते.”

शहरातून अभिनंदनाचा वर्षाव

शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, धर्मप्रेमी मंडळी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी अजिंक्य तारु यांचा फेटा बांधून, पुष्पगुच्छ देऊन आणि सोशल मीडियावर पोस्ट करून अभिनंदन केले. शिरूर शहरात अशी नियुक्ती होणे ही स्थानिकांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

भविष्यातील योजना आणि जनजागृती

नवीन जबाबदारीनंतर अजिंक्य तारु यांनी सांगितले की, ते शाळा-महाविद्यालयांमध्ये प्राणी कल्याण जनजागृती कार्यक्रम राबवणार आहेत. तसेच प्राण्यांवरील अत्याचाराविरोधात प्रभावी उपाययोजना, फिरती जनजागृती मोहिमा, तसेच आपत्तीच्या काळात प्राण्यांना मदत करण्यासाठी स्थानिक पातळीवर टीम तयार करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

शिरूरच्या भूमीतून घडलेले हे कार्यकर्तृत्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

Related Articles

Back to top button