मोठ्या शक्ती प्रदर्शनासह रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या तीनही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल
लोकांचा उदंड प्रतिसाद

रांजणगाव -कारेगाव (निलेश काळे): रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार स्वाती दत्तात्रय पाचुंदकर पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याचवेळी कारेगाव–कान्हूर मेसाई गणातून मनिषाताई सतिश पाचंगे तर रांजणगाव गणातून सागर देवकर यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

या प्रसंगी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रांजणगाव येथील श्री महागणपतीचे दर्शन व आरती घेऊन करण्यात आली. त्यानंतर महिलांनी पारंपरिक फुगडी घालत आनंदोत्सवात सहभाग नोंदवला, ज्यामुळे संपूर्ण रॅलीला उत्साही वातावरण प्राप्त झाले.

यानंतर सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाबुरावजी दौंडकर यांच्या स्मृतीला वंदन केले. तसेच रांजणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे कारेगाव व शिरूर येथेही विविध महापुरुषांच्या स्मृतींना वंदन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

भाजपकडून दाखल झालेल्या या उमेदवारी अर्जांमुळे रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्या स्वातीताई दत्ताशेठ पाचुंदकर यांनी पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांच्या कार्याचा आणि जनतेशी असलेल्या नात्याचा विश्वास आम्हाला आहे. जनतेचा भरभरून पाठिंबा त्यांना मिळेल आणि त्या पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
– शेखरदादा पाचुंदकर पाटील (माजी जिल्हा परिषद सदस्य, रांजणगाव-कारेगाव गट)





