राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषालीताई वाळके यांना जनसामान्यांचा प्रचंड प्रतिसाद
शिरूर ग्रामीण - न्हावरे जिल्हा परिषद गटात सहानुभूतीची प्रचंड लाट

शिरूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार वृषालीताई वाळके यांना शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जनतेतून व्यक्त होत असलेला विश्वास आणि आपुलकी ही वृषालीताईंच्या कामाची पावती ठरत आहे.

राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या पार्श्वभूमीवर प्रचारात भव्य कार्यक्रम न करता शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने घरोघरी जाऊन पत्रके वाटून संवाद साधला जात आहे. या संयमित प्रचारामुळे जनतेत सहानुभूतीची भावना अधिक दृढ झाली असून, नागरिक स्वयंस्फूर्तपणे वृषालीताई वाळके यांच्या पाठीशी उभे राहत आहेत.
शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे स्थानिक प्रश्नांची जाण, सर्वसामान्यांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख भूमिका यामुळे महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व घटकांतून वृषालीताईंना पाठिंबा वाढत आहे.

“शांत प्रचार, ठोस विचार आणि लोकांशी नाते”—या त्रिसूत्रीमुळे शिरूर ग्रामीण–न्हावरे गटात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस बळकट होत चालल्याचे चित्र आहे.

उमेदवारी मिळाल्यानंतर एवढ्या कमी कालावधीत प्रत्येक घराघरार्यंत तसेच वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचलेले राष्ट्रवादीचे तीनही उमेदवार जनतेच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. वृषालीताईंचा मनमिळावू शांत स्वभावही मतदारांच्या मनात घर करत आहे.

“आम्हाला पहिले वाळके कुटुंबीय परिचयाचे नव्हते पण या प्रचाराच्या निमित्ताने ते गावात आले आणि त्यांच्या शांत, संयमी व आपुलकीच्या वागण्यामुळे आम्हाला आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे ते वाटायला लागले” -अशी प्रतिक्रिया ही काही लोकांनी दिली.
सरतेशेवटी प्रचारात कसलेही भव्य कार्यक्रम नसले तरी अजित दादांच्या अपघाती निधनामुळे जनतेनेचं हा प्रचार हाती घेतल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.



